शिवीगाळ केल्यानं संतापला, भरदिवसा चाकूने भोसकून मित्राची केली हत्या.

शिवीगाळ केल्यानं संतापला, भरदिवसा चाकूने भोसकून मित्राची केली हत्या.


प्रतिनिधी - सचिन श्रीवास्तव सह अभिषेक पांडेय


नवी मुंबई:- पनवेलच्या सुकापूर भागात राहणाऱ्या नारळपाणी विक्रेत्याने आपल्या मित्रावर किरकोळ कारणावरून चाकूने हल्ला करून त्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. मेहबूब आलम (२२) असे या नारळपाणी विक्रेत्याचे नाव असून खांदेश्वर पोलिसांनी त्याला आपल्या मूळ गावी पटणा येथे पोहोचण्यापूर्वीच ओरा रेल्वे स्थानकातून अटक केली.


या घटनेत हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव सद्दाम शेख तजमूल तोफाजून शेख (३१) असे असून तो पनवेलच्या आदई गावात सोनाऊल हक या मित्रासोबत रहात होता. तसेच त्याच्यासोबत तो फळविक्रीचा व्यवसाय करत होता. मेहबुब आलम हा मृत सद्दाम शेख याच्या गावाकडील नातेवाईक असून तो पनवेलमधील मिराज चित्रपटगृहालगतच्या सिडकोच्या उद्यानाजवळ नारळपाणी विक्रीचा व्यवसाय करत होता. मेहबुब आलम व सद्दाम शेख यांच्यामध्ये अधूनमधून बोलणे होत होते. मात्र गेल्या आठवड्यात सद्दाम आणि मेहबुब यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. त्यामुळे गेल्या शनिवारी दुपारी मेहबुब याने सद्दामला फोनवरून शिवीगाळ करून त्याला आदई गावात येऊन मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे सायंकाळी सद्दाम आपल्या मित्राच्या स्कूटीवरून मेहबुब आलम याला जाब विचारण्यासाठी सिडको उद्यानाजवळील त्याच्या नारळपाणीच्या ठेल्यावर गेला होता. यावेळी मेहबुबने सद्दामला शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याने दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. या भांडणात मेहबूब आलम याने आपल्याजवळच्या चाकूने सद्दामच्या छातीवर व पोटावर गंभीर वार करून पलायन केले. या हल्ल्यात सद्दाम शेख गंभीर जखमी झाल्याने प्रथम त्याला अष्टविनायक रुग्णालयात व नंतर एमजीएम रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे सद्दामचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच खांदेश्वर पोलिसांनी आरोपी मेहबूब आलम याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. आलम मूळगावी पटणा येथे जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर खांदेश्वर पोलिसांच्या पथकाने त्याचा माग काढत, तो पटणा येथे पोहोचण्यापूर्वी त्याला ओरा रेल्वे स्थानकातून अटक केली. न्यायालयाने त्याला ३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी ठोठावल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक वैभव रोंगे यांनी दिली.