नवी मुंबई: महानगरपालिकेच्या वाशीव्यतिरिक्त इतर रुग्णलयातील अपुऱ्या आरोग्य सुविधा व खासगी रुग्णालये बंद असल्यामुळे कोरोना आजाराव्यतिरिक्त अन्य आजारांच्या रुग्णांचे हाल होत आहेत.
नवी मुंबईची आरोग्य सेवा आधीच सलाईनवर आहे त्यात कोरोनाचे संकट निर्माण झाल्यामुळे पालिकेने त्यांचे वाशी येथील मुख्य रुग्णालय हे करोनासाठी स्वतंत्र रुग्णालय केले असून इतर आजाराच्या रुग्णांची ऐरोली, नेरुळ व बेलापूर येथील रुग्णालयांत व्यवस्था केली आहे. मात्र या रुग्णालयाच्या इमारती अत्याधुनिक असल्या तरी येथे अपुऱ्या आरोग्य सुविधा आहेत.
पालिकेने वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयातील काही आरोग्य सेवा नेरुळ व ऐरोली येथील रुग्णालयांत हलवण्यात आल्या आहेत. तसेच नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातही व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या रुग्णालयांत योग्य पद्धतीने आरोग्य सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यात खासगी क्लिनिक व नर्सिग होम बंद असल्याने करोनाव्यतिरिक्त अन्य अजारांच्या रुग्णांचे हाल होत आहेत. पालिकेने शहरातील २७ आरोग्य केंद्रांत ताप तपासणी केंद्रे सुरू केली असली तरी अपघात, हृदयरोग तसेच अन्य लहान-मोठय़ा आजारांच्या रुग्णांची परवड सुरू आहे. काही दिवसांपूर्वी शिवाजीनगरमधील एका रुग्णाला सातत्याने खोकल्याचा त्रास होत होता. मात्र त्याला नेरुळ व वाशी येथील पालिका रुग्णालयात दाखल करून घेतले नाही. वाशी रुग्णालयात गेल्यानंतर नेरुळच्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. नेरुळला गेल्यानंतर खोकला असल्याने त्याच्यावर उपचार करण्यात आले नाहीत. याबाबत पालिका अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर त्याची वाशीच्या रुग्णालयात कोरोनाची तपासणी करण्यात आली.
पालिकेने नेरुळ येथील रुग्णालयात एचआयव्ही व क्षयरोग तर ऐरोली येथील रुग्णालयात फेलोसिनिया विभाग हलविण्यात आला आहे. परंतु या दोन्ही रुग्णालयांत अतिदक्षता विभागच नसल्याने या रुग्णांवर उपचारासाठी अडचण येणार आहे.
नवी मुंबईतील बिगरकोरोना रुग्णांचे हाल, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अपुऱ्या सुविधा.